चढाई

सांगताना सत्य विद्रोही बनावे लागले
शेवटी धंद्यात खोट्याच्या मुरावे लागले

पार केली ती चढाई त्रास झाला एवढा
तोल सांभाळायला थोडे झुकावे लागले!

आवडीचे काय माझ्या प्रश्न ना केला कधी
मेंढरे कळपातली तैसे रहावे लागले

कार्य हे माझे नव्हे अन् मार्ग हा माझा नव्हे
हे कळाया एवढी वर्षे शिकावे लागले

बालकाच्या ज्या कलेचा बोलबाला जाहला
सोंग ते आजन्म त्याला वागवावे लागले…

शांततेने बोललो तेव्हा न त्यांनी ऐकले
शांततेसाठीच हाती शस्त्र घ्यावे लागले!

आसवांनी मैफिली शृंगारलेल्या सर्वदा
हासणे साधे बिचारे आवरावे लागले!

पामराला भेट होणे पांडुरंगाची कशी?
थोर संतांना किती त्या आळवावे लागले…

Advertisements

साक्ष

किती सोनेरी ते पळ होते
दिसले सोने जे पितळ होते

गाळ सारा साठला तळाशी
वरवरचे पाणी नितळ होते

म्हणे शब्दांनी गफलत केली
मन तरी कोठे निर्मळ होते?

ही अदब कुठून आली दोस्ता?
पूर्वीचेच हास्य निखळ होते

वाट मला ओळखीची होती
पण ठेचकाळणे अटळ होते!

तुझी माझी चूक नव्हती कधी
पण साक्ष पुरावे सबळ होते!

अस्त

सूर्य जाताना लयाला रंग सारे देखणे
त्याचसाठी काय अस्ताचे तुझे हे मागणे?

आज म्हातारा सुखी त्याच्या घरी आली मुले
का कुणी तेथे वकीला धाडले बोलावणे?

चांगली कामे तुझी अन् अंतरीही गोडवा
का तरी वाटे अताशा कोरडे ते बोलणे?

टाळले तू शब्द माझे काळजीचे कैकदा
वेळ गेल्या का कळावे आजचे हे सांगणे?

युद्धजेत्या, अंतरीचा द्वेष आता सोड रे
शोभते का दुश्मनाचे प्रेत ते लाथाडणे?

कळाले

भासते की खूप काही खास आम्हाला कळाले
लागणारी ठेच सांगे काय कोणाला कळाले!

काल सा-यांना कळाला दानवीराचा ठिकाणा
राहिला तोही न दानी त्या जमावाला कळाले

आणता डोळ्यांत पाणी लाभ ना होणार काही
अंतरी आहे तुझ्या ते आज वेड्याला कळाले…

उत्तरे शोधून झाली सापडेनाशी पुन्हा ती
मानतो आनंद काही प्रश्न जीवाला कळाले!

सांग गं सारे खरे आता पुरे झाले इशारे
मी मनी खातोय मांडे जे न कानाला कळाले!

काळ तो शेतात आला प्राण नेण्याला तयाचे
सोडले आधीच त्याने प्राण काळाला कळाले

लाट

आमुच्या राजाकडे रे वैभवाचा थाट आहे
ते तिथे धुंदीत, लोकांचे रिकामे ताट आहे!

राजवाडा भव्य तो, सारी सुखे राजापुढे रे
सत्य त्याला कोण सांगे, जो दिसे तो भाट आहे

चांगल्या कामातही का पावले मागे पडावी?
पाप सारे आज येथे हिंडते मोकाट आहे

गुंतलो कामात थोडासा उशीरा काय आलो
संशयाचे अन् सवालांचे धुके का दाट आहे?

संग थोडे चालले जे, ते वळाले, दूर गेले
जीवनाची या कशी ही नागमोडी वाट आहे!

श्रावणी पाऊस गेला, ढाळतो पाने अता रे
एकटा मी त्या सरींची पाहतो का वाट आहे?

भेटती कित्येक काही ना कधीही वाटले रे
संगती वाहून नेणारी कशी ही लाट आहे!

गोपीसाद

तव मुरलीविन उदास यमुनाकाठ
दह्यादुधाची हंडी पाहती तुझी वाट
आठवते पुन्हा शरदातील रासलीला
एकदा गोकुळा ये गोपाळा!

बालपणी खेळ, खोड्यांत रमलास
लहानच होतास, मथुरेस गेलास
मग राहिल्या आठवणी, येतात वार्ता
तुझे कार्य थोर, कळते भगवंता
परि कशी समजावू वेड्या मनाला
एकदा गोकुळा ये गोपाळा!

तू द्वारकाधीश, सुदर्शनधर
माझ्या मनी बालक खोडकर!
जपण्यास त्या बालमूर्तीला
येत नसशील तू गोकुळा
परि घ्यावे बालरुप, विनविते तुजला
एकदा गोकुळा ये गोपाळा!

वहिनी

कधी एकीला फोन, कधी दुसरीबरोबर
कुणाला वहिनी म्हणू, सांग तरी खरोखर!

पर्सनॅलिटी दांडगी तुझी, वळती सर्व बाला
तू ठरतोस हिरो, आम्ही मात्र दादा!

कित्येक बाला येतात, तसाच शांत राहतोस
कधीतरी मग अशी भेटते, तू घायाळ होतोस!

आपलं तसं काही नाही, असं सारखं म्हणतोस
ती दुसर्याला बोलली, की तोंड पाडून बसतोस!

सोडून जाता बाला, चढेपर्यंत घेतोस
पुन्हा चार दिवसांनी प्रेमगीत गातोस!

प्रेमाची, विरहाची तुझी भावना, कल्पना, कविता
कुणाला वहिनी म्हणू, सांगून टाक आता!